चिंधी
कालचीच गोष्ट आहे.लॉकडावूनमुळे बऱ्याच गोष्टी असूनही आपल्या घरात आणणे मुश्कील झाले आहे.असेच एका ओळखीच्या भाजीवालीने, मला लोणच्याची कैरी आणून दिली.पण ती तशीच फोडून दिल्यामुळे अतिशय खराब दिसत होती.ती सुती कापडाने स्वच्छ पुसून घ्यावे असे मला वाटले.पण दुर्दैव असे की,घरभर शोधले तरी सुती कपडा काही सापडला नाही.टेरीन,टेरीकॉट, नायलॉन,शालू, पैठणी सगळे दिसले,दिसला नाही तो सुती कापडाचा एक तुकडा.शेवटी एक ओढणी फाडून त्या कैऱ्या स्वच्छ केल्या.स्वच्छ करता करताच आईचे वाक्य आठवले.माझे बोट कापले होते, तेंव्हाही आईला माझ्या घरात चिंधुक सापडले नव्हते पटकन बोटाला गुंढाळायला.
आई म्हणाली होती तुमच्या पिढीला खूप ऐश्र्वर्य लाभले आहे.शालू पैठण्या सगळे आहे.पण एक साधी चिंधी नसते तुमच्याकडे.अग,बोट कापले तर त्याला चिंधीच गुंडाळायची असते.द्रौपदीने भरजरी शेला फाडून कृष्णाच्या बोटाला बांधली होती.त्या मोबदल्यात वस्त्रहणाच्या वेळी कृष्णाने द्रौपदीला अगणित वस्त्र पुरविले होते.इतके मोठे महत्त्व या छोट्याशा चिंधीत आहे.त्यामुळे आपण एक तरी सुती कापड घरात ठेवायलाच पाहिजे असे काल मला प्राकर्षाने जाणवले.सुती कापड उन्हाळ्यात गारवा देते, हिवाळ्यात ऊब देते आणि पावसाळ्यात संरक्षण करते.म्हणूनच शालू पैठणी बरोबरच एक सुती साडी अवश्य घ्यायची.फाटली तरी तिची प्रत्येक चिंधी न चिंधी उपयोगात आणता येते.जिथे बांधली तिथे नीट चिकटून बसते.आणि सोने किंवा किंमती वस्त्र चिंधीत बांधून ठेवले तर ते एकदम सुरक्षित राहतात.म्हणूनच म्हणतात की,सोन्यासाठी चिंधीला जपायचे असते.
सौ.कमल सोनजे पुणे .
Comments
Post a Comment